पाण्यासाठी नागमठाण पुलावर बेमुदत उपोषण

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) : नांदूर - मधमेश्वर कालव्यातून कमलपूर, खानापूर, नावूर व वांजरगाव येथील केटी वेअरमध्ये हक्काचे पाणी सोडून ते भरून द्यावे, यासाठी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश तांबे यांच्यासह दहा शेतकऱ्यांनी नागमठाण येथील गोदावरी नदीच्या पुलावर ११ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

शनिवारी (ता. १४) उपोषणाचा चौथा दिवस होता. दरम्यान, उपोषणकर्ते तांबे यांची प्रकृती खालावत असल्याने संतप्त झालेल्या गंगथडी परिसरातील सप्तकृषी शेतकऱ्यांनी कमलपूर बंधाऱ्यावर जोरदार रास्तारोको आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. १५ ऑक्टोबरला सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली होती.

त्यावेळी विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाणी देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. तिन्ही केटी वेअर किमान ५० टक्के भरून द्यावेत, सोडलेल्या पाण्याची लेखी माहिती द्यावी आणि वैजापूर - श्रीरामपूर तालुक्यांतील १०० गावांचा पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 

या रास्तारोको आंदोलनात परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून विरगाव पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.